बालपण,समज आणि शिळी भाकरी

 आमच्या 80 च्या दशकात जन्मलेल्या पिढीचे बालपण सर्वार्थाने भन्नाट आणि तितकेच भाबडे देखील होते.अनेक अतर्क्य गोष्टींवर आमचा लगेच विश्वास बसायचा.आमच्या घरातले वडीलधारे देखील आमचे चौखूर उधळणारे बालपण धाकात ठेवण्यासाठी अनेक स्टोऱ्या आम्हाला बेमालूम पणे चिकटवायचे. आणि आमचा देखील त्यावर विश्वास बसायचा,पण असे का हे विचारायची हिम्मत व्हायची नाही.

  आमच्या पिढी मध्ये कॉमन आणि तितकेच "लोकप्रिय"असलेले समज म्हणजे...फळाची बी गिळली तर पोटात झाड येते,एक साळुंकी दिसली तर दिवस वाईट जातो आणि दोन दिसल्या तर चांगला,कुठेही गाढव ओरडण्याचा आवाज ऐकला आणि स्वतःच्या डोक्याच्या केसांना हात लावला तर केस चांगले लांबसडक्क वाढतात.आणि सगळ्यात अतरंगी समज काय तर मेहंदी मध्ये चिमणी ची "शी"घातली की मेहंदी लालचुटुक रंगते...मग काय सणासुदीला मेहंदी लावण्याआधी आमचा मोर्चा गावातल्या वडाच्या पाराखाली जमायचा कारण तिथे असा "ऐवज" मुबलक असायचा.बाई कित्ती ते भाबडेपण.

  आणि या सगळ्यावर वरताण,आम्हाला चिकटवून गळी उतरवलेली गोष्ट म्हणजे....तू आमचा/आमची नाहीचेस,तुला शिळ्या भाकरीच्या तुकड्यावर विकत घेतली आहे.पोरं बिचारी हे ऐकून मनात उगाच एक पोरका भाव घेऊन घाबरी व्हायची...तेव्हढ्यापुरती.आणि हा शिळ्या भाकरीचा सिद्धांत पुढे 'आपण या पृथ्वी तलवार कसे प्रकट झालो, याची समज येईपर्यंत कायम होता.

  आमच्या घरात तर किस्साच वेगळा होता,पाच भावंडांमध्ये मी सर्वात धाकटी असल्यामुळे मोठ्या भावंडांचे कायम "गिर्हाईक" होते.ते मला सांगायचे की तुला नव्या पुला वरच्या सगुणा कडून विकत घेतले आहे आणि ती तुझी आई आहे.(नव्या पुलावर म्हणजे corporation च्या पुलावर सगुणा नावाची एक अतिशय कमी उंची ची बाई बसलेली असायची,असे माझ्या वाडीलांकडून ऐकले होते,मी मात्र तिला कधीच बघितले नाही) मग काय या पुला वरून पुण्यात जाताना छातीत उगाच धडधडायचे, न जाणो कुठून ही बया आली आणि मला घेऊन गेली तर...मग आई अथवा वडिलांच्या आधीच घट्ट धरलेल्या बोटावरील पकड अजून घट्ट व्हायची.

  आता स्वतः पालक या भूमिकेत आल्यावर मी देखील अशीच एक स्टोरी माझ्या 11, 12 वर्षाच्या लेकाला चिकटवायचा प्रयत्न केला,त्याला म्हणाले की 'अरे तुला शिळ्या भाकरी च्या तुकड्यावर विकत घेतले आहे आणि तू गोरा,घारा ,गोबरा होतास म्हणून अर्धी ताजी भाकरी जास्त दिली.क्षणभर माझ्या चेहऱ्याकडे निरखून बघत,internet च्या युगात जन्माला आलेलं आणि प्रत्येक गोष्टी चे "scientific reason" मागणार माझं पोर मला म्हणाले.....आई चल "DNA Test "करूया.

आश्चर्यचकित,विस्मयचकित,भयचकित आणि नुसताच चकित अशा संमिश्र भावनांनी माझ्या चेहऱ्याचा कॅलिडोस्कोप झाला आणि google शिवाय शिक्षण पूर्ण करून स्वकमाई वर   iphone घेऊन तो वापरणाऱ्या माझ्या आख्या एका पीढी ने या New Generation समोर डोके टेकले.


ऋतुजा नाईक.

  #Marathi fine writing

#Life style


Comments

  1. (पुनः-)प्रत्ययकारक अन् Pleasant.

    ReplyDelete
  2. ही नवी पिढी सवाई आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नवी पालवी नवी उमेद

इंटिरियर डिझाईन मध्ये रंगांचा वापर(#Role of different color in interior designing)Brown color

देजा वू #Deja Vu