संध्याकाळ...
वेळ सायंकाळी 6 किंवा 6.30 ची.ठिकाण,एका उच्चवर्गीय परिसरातील एक "सुपरशॉपी".
खण्यापिण्या पासून सौन्दर्य प्रसाधनांपर्यंत असंख्य वस्तूंनी अक्षरशः लडबडलेले ते दुकान,सधन आणि सुखवस्तू ग्राहकांनी देखील तेवढेच गजबजलेले होते."ऑफिस" मधून घरी जाता जाता रोजच्या गरजेच्या आणि काही सहज "दिसल्या म्हणून घेतल्या"अशा वस्तूंच्या खरेदीसाठी प्रत्येकाची लगबग चालू होती.
तर अशा संध्याकाळी रोजचा भाजीपाला घेऊन,जाता जाता घरातील एक दोन वस्तू घेण्यासाठी मी देखील त्या गर्दीचाच एक भाग झाले होते.सासूबाई आत दुकानात गेल्यामुळे भाजीच्या अवजड पिशव्या सांभाळत मी बाहेरच उभी राहिले, गर्दीत असूनही काहीशी अलिप्तपणे.
इतक्यात कुठूनतरी काहीश्या घाईघाई मध्ये "तो" अवतरला,त्या गर्दीशी पूर्णपणे "Mismatch" असलेला....काळपट रंगाची ढगळ पॅन्ट आणि कधी काळी पांढरा असलेला पण आता रंग ओळखण्याच्या पलीकडे गेलेला शर्ट घातलेला "तो",कदाचित "कामावरून" परतत असावा.सवयीचे असल्याप्रमाणे तो दुकानाच्या पायरीवर जाऊन उभा राहिला."सुपरशॉपी"असल्यामुळे दूध,दही,चीझ इत्यादी वस्तूंनी शिगोशिग भरलेला फ्रिज बाहेरच ठेवलेला होता. सराईतपणे फ्रिज चे दार उघडून त्याने आतून दूधाच्या अर्धा लिटर च्या दोन पिशव्या बाहेर काढल्या. मी लांबूनच त्याचे निरीक्षण करत होते,आता तो आत दुकानात जायला निघाला आणि आत जाता जाता त्याने बेमालूमपणे हातातील दुधाची पिशवी खिशामध्ये सरकवली.त्याच्या त्या ढगळ पॅन्ट चा खिसा ही इतका मोठा होता की अर्धा लिटर ची ती पिशवी त्याच्या खिशात सहज मावली.कदाचित तो खिसा ही त्याच्या इतकाच सराईत असावा.
पिशवी खिशात सरकवताना त्याने सहज मागे वळून बघितले,की कोणी बघत तर नाहीये ना.आणि असे बघतानाच त्याचे लक्ष माझ्याकडे गेले,झाल्या प्रकाराने माझा चेहरा आवाक झालेला तर त्याचा संकोचून घाबरलेला.आपल्याला कोणीतरी बघितले हे बघून त्याने काउंटर वर घाईघाईने एकाच पिशवी चे पैसे दिले आणि तेवढ्याच तत्परतेने तो बाहेर सटकला आणि झपाझप चालत पसार देखील झाला.
त्याच्यासाठी कदाचित हे रोजचेच असेल किंवा घरी खाणारी तोंडे जास्त आणि येणारा पैसा कमी असेही असेल म्हणून ही त्याच्या कडून हे घडले असेल.कारण काहीही असो पण त्याने चोरी केली होती,आणि नकळत पणे मी त्या प्रसंगाची साक्षीदार झाले होते.
दुकानदाराने चुकून जास्त पैसे दिले तरी ते लगेच परत करणारी मी, झाल्याप्रकाराने अचंबित झाले होते.मला कसे रिऍक्ट व्हावे तेच कळेना.चोरी करणे हे चूकच आहे,आणि आपल्या डोळ्यासमोर चुकीच्या गोष्टी घडताना बघून गप्प बसने हे देखील चूकच आहे.पण रोज हजारो रुपये नफा कमावणाऱ्या त्या दुकानदाराला "तुझ्या दुकानातून अर्धा लिटर दुधाची चोरी झाली"हे सांगून मी काय मिळवणार होते?मी गप्प बसने पसंत केले.
असे म्हणतात की अन्न घेऊन पळणाऱ्या कोणत्याही प्राण्याला कधीही थांबवायचे नसते,पाप असते ते.(मनुष्य हा देखील "प्राणी" या संकल्पनेमधेच येतो ना?)
सुखवस्तू गर्दीत "Mismatch"असणाऱ्या "त्या"ने अर्धा लिटर दूध च तर चोरले होते आणि ती चोरी बघून मी गप्प बसले होते.आता नक्की माहीत नाही चोरी ही त्याची गरज होती की सवय......त्या संध्याकाळी माझ्या हातून नक्की काय घडले पाप की पुण्य?
Rutuja Naik
#Marathi fine writing
#Life style
Mast
ReplyDeleteसाधाच प्रसंग पण छान व्यक्त केला आहे.आवडले!
Deleteसहजसुलभ कथन.
ReplyDeletekhup chan aahe....
ReplyDelete