नवरात्र आणि जयजेव जयजेव

 माझ्या लहापनी नवरात्री मध्ये आमच्या घरी देवीची आरती करायला एक बऱयापैकी वृद्ध जोडपे यायचे.तसे ते चाळी मध्ये ज्याच्या कडे घट बसलेले असतील त्या प्रत्येकाकडे जायचे.मळकट धोतर त्यावर त्याच रंगाचा सदरा आणि डोक्यावर तिरकी ठेवलेली गांधी टोपी,तीही बऱ्यापैकी धोतराच्या मळकट पणाशी स्पर्धा करणारी.उन्हाने रापलेला चेहरा आणि पान खाऊन खाऊन लाल झालेले दात ,अशा वेशातील आजोबा आणि त्यांना matching होईल अशी हिरव्या अथवा लाल सुती नऊवारी साडीतली ठेंगणी आज्जी. कपाळावर लाल ठसठशीत कुंकू आणि अंगावर मोजके दागिने.कधी कधी त्यांचा 8 /9 वर्षांचा नातू सुद्धा यायचा त्यांच्याबरोबर.तो बरोबर असला की आई मग त्याला भाजी पोळी अथवा काहीतरी खाऊ द्यायची.

चाळीतील ठरलेल्या घरांसमोर उभे राहून संबळ च्या तालावर typical कमावलेल्या आवाजात ते दोघे आरती गायचे.प्रत्येक वर्षी नवरात्री मध्ये ती दोघे आमच्या घरासमोर 10 दिवस आरती म्हणायचे.पण इतक्या वेळेला ऐकून सुद्धा त्यातील "जयजेव जयजेव"एवढा एकच शब्द आम्हाला कळायचा. बाकी काय म्हणायचे ते त्यांचे त्यांनाच ठाऊक.

त्यांनी चाळीत एन्ट्री केली की मी आणि बहीण आई ला ओरडून सांगायचो..आई "जयजेव जयजेव"आलेत. आणि मग ते पूर्ण चाळीची आरती उरकून जाईपर्यंत आम्हा रिकामटेकड्या पोरांचे लटांबर त्यांच्या मागोमाग जात राहायचे,पण एवढे मागे फिरूनही ते कोणती आरती म्हणायचे ते कळलेच नाही.दरवर्षी नित्यनेमाने ते दोघे ठरलेल्या वेळेला यायचे. त्यांच्या येण्यात कधी खंड पडला नाही.कुठे राहायचे कोणास ठाऊक.

दसऱ्याला ते मग दक्षिणा घ्यायला यायचे.प्रत्येक घर मग त्यांना आपल्या ऐपती प्रमाणे पैसे,धान्य आणि घरात बनलेले गोडधोडाचे द्यायचे.जे द्याल ते घेऊन ती दोघे निघून जायची....पुन्हा पुढच्या वर्षी "जयजेव जयजेव"करण्यासाठी.

पुढे आम्ही ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेलो .पण आज इतक्या वर्षांनी सुद्धा नवरात्र आले की "जयजेव जयजेव"आजी आजोबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.आणि आठवणी बरोबरच ते दोघे सुद्धा जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात.

Rutuja Naik

#Marathi Fine writing

#Marathi blogs


Comments

Popular posts from this blog

नवी पालवी नवी उमेद

इंटिरियर डिझाईन मध्ये रंगांचा वापर(#Role of different color in interior designing)Brown color

देजा वू #Deja Vu